आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत. हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...