Skip to main content

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष



                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.
         हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वरुपी लॉकडाऊनच म्हणावे लागेल. पश्चिम घाटातील चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून गोव्याच्या सीमेपर्यंत पाहिलं तर आज बहुतांशी गावाच्या आसपास वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यामध्ये सांगलीतील शिराळा तालुका तसेच कोल्हापूरमधील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा,चंदगड या तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. हा उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे जंगलातील मर्यादित पाणी साठे आटतात व गवे, भेकर, रानडुक्कर, बिबट्या अश्या प्राण्यांना पाण्याचा शोधात माणसाने निर्मित केलेल्या जंगलाच्या सीमा तोडाव्या लागतात. लॉकडाऊनमुळे साहजिकच या परिसरातील पर्यटन आणि वाहतूक कमी झाल्यामुळे कित्येक वर्षांपासून रस्त्यांच्या जोखडात बांधून ठेवलेले वन्यप्राणी आता मुक्त वावर करू लागले आहेत. पण सध्या ज्याप्रमाणे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या लोकांच्या बातम्या टीव्ही वर आपण पाहत आहोत, तश्या कितीतरी बातम्या गवा गावात आला तर आपल्याकडे नेहमीच होतात. खर तर त्यांच जंगल विकासाच्या नावाखाली आपणच संकुचित केलंय. पण खरंच या विषयासाठी वन्यप्राण्यांना आणि निव्वळ वनविभागाला दोषी धरण्याची गरज आहे का ? ज्यांचे वन्यप्राणी हल्ल्यामध्ये नुकसान होते त्यांना ही बाब कदाचित पटणारही नाही परंतु तेवढ्यापुरता वन्यजीवांना हानी पोहचविणारे उपाय करून अथवा वनधिकाऱ्यांना वेठीस धरून त्यावर तोडगा निघणे शक्य आहे का? मनुष्यावर एखादा वन्यप्राणी हल्ला झाला तर ती बातमी फ्रंट पेजवर असते. पण पश्चिम घाटातील कितीतरी गावात रोजरास वन्यप्राण्यांच्या शिकारी चालू आहे त्याचा थांगपत्ता ही लागत नाही. या लॉकडाऊनमुळे तर मानवी वस्तीजवळ वन्यजीव येण्याचं प्रमाण वाढले आहे ही बाब जितकी माणसाला घातक वाटते त्यांच्यापेक्षाही अधिक ती वन्यजीवांना आहे, कारण याच लॉकडाऊनचा फायदा घेऊन जंगलामध्ये शिकारीसाठी लावले जाणारे फासेही वाढत आहेत. गावाजवळ एखादा बिबट्या किंवा गवा आला तर आख्खा गाव काट्या कुराडी घेऊन त्याच्यामागे लागत. मनुष्यवस्ती जवळ वन्यजीव नकोच ...हे असं ठाम मत का बर आहे आपलं? या प्राणी पक्षांच्या सोबतीने माणूस कित्येक वर्ष जंगलातच राहत होता, आजही किती तरी आदिवासी जमाती या सहजीवनात आपलं आयुष्य जगत आहेत. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातही बिबट्या आज आसपासच्या मनुष्यवस्तीमध्ये एक मुक्त आणि निर्भयपणे वावर करणारा प्राणी ठरत आहे. त्यामुळे वन्यजीव जर या लॉकडाऊन काळात आपल्या जवळ येत आहेत तर त्यांच्यासोबत जुळवून घेऊन जगण्याची ही एक संधी मिळाली आहे असं समजुया ना की हे एक संकटं...आणि त्यांचा वावर आणि आपली सुरक्षितता या दोन्हींची काळजी घेत खराखुरा नैसर्गिक माणूस म्हणून भूमिका बजावूया....


चेतन कोकटनूर
वन्यजीव अभ्यासक
Inside Nature, Kolhapur

Comments

  1. मानव अतिबुद्धीमान असल्याने, फक्त स्वतःच्याच जीवाला महत्व देत आला आहे. परंतु, माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की त्याचे अस्तित्व वन्यजीव आणि इतर जीवसृष्टीवरच पुर्णतः अवलंबून आहे.

    चेतन, खूप छान अभ्यासपूर्ण लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम योग्य सारांश आहे आपला.

      Delete
  2. माणूस निसर्गाचा एक भाग आहे हेच विसरतो मालक बनतो आणि मग संघर्ष निर्माण होतो...
    उत्तम निरीक्षण...👍👌

    ReplyDelete
  3. Sir, this is not only Excellent Writing & thinking but also Showing Sympathy towards our Nature, Plant's & Animals.
    Thanking you Sir for creating awareness regarding Environment.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...