Skip to main content

' शिकारी '...एक बदनाम भूमिका


                                  नुकताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या
आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो.
निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले कारण जेव्हा वाघ, बिबट्या एखाद्या प्राण्यांची शिकार करतात तेव्हा ते आपली भूक भागुपर्यंत त्या प्राण्याचं मांस खातात आणि उर्वरित भाग तसाच जंगलात सोडून देतात. आता हे उरलेले मांस हे दुसऱ्या गटातील प्राणी म्हणजे (मृतोपजीवी) तरस, गिधाडे संपवून टाकतात. म्हणजे ही एक निसर्गाची अन्न साखळी आहे. शिकारी प्राण्यांची शरीराची ठेवण ही शिकार करण्यासाठी तर मृतोपजीवी प्राण्यांची रचना ही उर्वरित मांस सहजरीत्या ओरखडून काढण्यासाठी योग्य अशी असते. गिधाड पक्षी पाहिला असेल तर त्याचा मानेवर पिसे नसतात याच कारण ते आपली मान मेलेल्या जनावराच्या शरीरात आतपर्यंत सहज घालू शकतात. यांची पचन संस्थाही अगदी सडलेले मांसही पचवू शकतील अशी असते.
         आता प्राचीन काळापासून आजपर्यंत माणसामध्येही शिकारी आहेत.त्यामध्ये पाहिला गट आहे तो काही आदिवासी जमातींचा जे आजही आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी शिकार करतात. दुसरा गट आहे तो काही रॉयल लोकांचा जे आवड आणि एक थरारक अनुभव म्हणून शिकार करतात. तिसरा गट आहे तो आपल्या जिभेच्या चवीसाठी मुक्या वन्यजीवांना मरणाऱ्यांचा. आणि चौथा गट आहे पैश्याच्या हव्यासासाठी/तस्करीसाठी वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांचा.
आता आपण यातील निसर्गाने निर्माण केलेला 'शिकारी' या गटाची म्हणजेच प्राणी जगतातील शिकारी याची माहिती घेऊ.
निसर्गाने हे सर्व जीव निर्माण केले आणि त्यांची विभागणी शाकभक्षी (म्हणजे वनस्पती खाणारे) आणि मांसभक्षी अशी केली. या पृथ्वीवर वनस्पतीची संख्या तुलनेने अधिक आहे त्यामुळे थेट त्यांना खाणाऱ्या प्राण्यांची संख्याही अधिक आहे आणि त्यांच्या संख्येला नियंत्रित ठेवू शकेल अशी मांसभक्षक प्राण्यांची संख्या असावी लागते यालाच पर्यावरणाची संतुलित अन्न साखळी म्हणतात. यातील एखादा घटक कमी अथवा अधिक झाला हे संतुलन बिघडते. त्यामुळे निसर्गात या शिकारी प्राण्यांची संख्या ही कमी असली तरी त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. त्यामुळे हेच खरे निसर्गाने निर्मित केलेले शिकारी आहेत.
माणसाने स्वतःला जी शिकारी हे बिरूद लावून घेतले आहे ते खरोखर प्रमाणशीर आहे का याचा विचार करावा लागेल. जे आदिवासी लोक जंगलात शिकार करतात त्यांचा मुख्य हेतू हा अन्नाची गरज भागविणे असा असतो  जो पृथ्वीवरील कोणत्याही सजीवाची नैसर्गिक गरज आहे. हे आदिवासी शिकार सोडली तर निसर्गावर आपल्या प्रगत मानवाप्रमाणे अतिरिक्त ताण देत नाहीत शिवाय त्यांची जीवनशैलीही पूर्णतः निसर्गपुरक असते. कितीतरी जमाती या अश्या असतात की जे शिकार करताना नैतिकता आणि आध्यात्मिक नितीमुल्यांची जोपासना करतात. जसे की गरजे पुरती शिकार करणे, ठराविकच वन्यजीवांची शिकार करणे, आपण शिकार करत असलेल्या प्राण्यांच्या संख्यावाढीसाठी पूरक अश्या गोष्टी करणे, प्राण्यांच्या प्रजनन काळात शिकार न करणे. इत्यादी. अर्थात कोणताही वन्यजीव मारणे हे समर्थनीय नाहीच आहे परंतु हा आदिवासी शिकाऱ्यांचा गट सोडला तर बाकीची सगळे मानवी शिकारी अगदी निसर्गाला ओरबाडून वन्यजीवांचा शेवट करत आहेत. आजही सह्याद्रीतील गावांमध्ये, कोकणात लोक शिकरीला जातात. २०१३-१४ साली मला कोल्हापूर जिल्ह्यात एका सर्वेक्षणात अस आढळलं की जिल्ह्यात दररोज सरासरी ४० हून अधिक शिकारीचे प्रयत्न होतात. कित्येक गावात अवैध शिकाऱ्यांचे 'टिप्सर' जे की शे- दोनशे रुपयांसाठी एखाद्या वन्यप्राण्यांची टीप देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. पण बंदुकी सारख्या सुरक्षित शस्त्राने लांब अंतरावरून एखाद्या निष्पाप जीवाला मारून ' शिकारी ' हे बिरूद लावणं साफ चुकीचं आहे. पैश्याच्या हव्यासासाठी वाघाचे,बिबट्याचे पंजे कापून त्यांना फेकून देणारे कधीच शिकारी असू शकतं नाहीत. कणकेत हातगोळे घालून ते रानडुक्करांच खाद्य म्हणून त्यांचा वाटेवर ठेवलं जात, अश्या क्रूरतेने त्यांचा तोंडात ती स्फोटक फोडून मारणारी, माकडांची पिल्ले पकडणं सोप व्हावं म्हणून त्यांच्या आईला पिलांसमोरच क्रूरपणे मारून टाकणाऱ्याना किंवा चार पैश्यासाठी सापांची निर्दयपणे कातडी सोलून काढणाऱ्यांना आपण फार तर वन्यजीवांचे मारेकरी म्हणू शकतो. कारण शिकारी हे फक्त एक बिरूद किंवा उपाधी नाही तर ती निसर्गाने पर्यावरण संतुलित करण्यासाठी निर्माण केलेली एक महत्त्वाची भूमिका आहे. ज्याची जबाबदारी घेण्याइतपत माणूस योग्य नाही आहे. शिकार करणे हा कायदेशीर गुन्हा तर आहेच पण तो मानवतेचा पण गुन्हा आहे. याचा परिणाम म्हणून चित्त्यासारखा प्राणी ७५ वर्षापूर्वीच भारतातून नामशेष झाला,  दरम्यानच्या काळात वाघांची संख्याही खूप कमी झाली होती. 'प्रोजेक्ट टायगर'च्या माध्यमातून आपण त्यांना सावरलं आहे. तरी देखील मागील तीन वर्षात भारतात ३२९ वाघांचा मृत्यू झाला . ज्यामधील फक्त ६८ वाघांचाच मृत्यू हा नैसर्गिक आहे. निसर्गाने मनुष्य प्राण्याला अधिक बुद्धी आणि शारीरिक अनुकूलता दिली, त्याचसोबत इतर प्राणी सृष्टीच्या रक्षणाची एक अप्रत्यक्ष जबाबदारीही दिली होती. ती आपण हळूहळू विसरत चाललो आहोत. मानवी कृत्यांचा अप्रत्यक्ष वाईट परिणाम हा वन्यजीवांना भोगावा लागत आहेच, ज्याच्यापासून सामान्य माणूस हा बऱ्याच अंशी अनभिज्ञ आहे पण शिकार करणं हे तर त्यांच्या अस्तित्वावरच केलेला हल्ला आहे. निसर्गात ' शिकारी ' म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे त्याला आपल्या मानवी हिन कृत्यांनी मलीन करणं कितपत योग्य आहे? याचा आपण सर्वांनी विचार हा करायलाच हवा.

© चेतन सुरेश कोकटनूर
    Inside Nature, Kolhapur


     






Comments

  1. अतिशय सुंदर लेख चेतन सर💐👌👍

    खोट्या अभिमानाच्या नादात आपण निसर्गाचेच नकळत गुन्हेगार बनत आहोत. आणि सामान्य लोक या सगळ्यांपासून खूप दूर असतात हे वाक्य सुद्धा 100% पटतंय मला..

    💯

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...