Skip to main content

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?



                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आपण खूपच अनभिज्ञ आहोत. या विषयीच आज थोड बोलूया.
                  आज काल कॅमेरा (मोबाईल) हा सगळ्यांच्या खिश्यात आहे. त्यामुळे आपण सगळेच फोटोग्राफर झालो आहोत. त्याच्यापुढे जाऊन बऱ्याच जणांनी महागडे कॅमेरे घेतलेत, जे लोक छंद म्हणून निसर्ग छायाचित्रे तसेच काही वन्यजीवांचे छायाचित्रे काढत असतात. सुरवातीला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे अशी मान्यता असणारे काही जण थोडे दिवस गेले की, फेसबूक, इंस्टाग्रामवर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून स्वतःला उपाधी देऊन रिकामे होतात. मग चालू होते एक अघोषित स्पर्धा... टायगरचा मला असाच फोटो पाहिजे, किंग कोब्राचा हेड शॉटच पाहिजे. या सिझनचा पाहिला अमुर फाल्कन मीच टिपणार. अशी बरीच धडपड मी या फोटोग्राफरमध्ये अनुभवली आहे. स्वतःला निसर्गाची अथवा वन्यजीवांची माहिती नसेल तर निसर्ग अभ्यासक मंडळींना विचारून का होईना पण त्या एका बेस्ट क्लिक साठी वाटेल ते करायची तयारी या मंडळींची असते. आता हा उत्साह  एवढ्यापुरताच मर्यादित राहिला तर ठीक; पण चांगले फोटो मिळवण्यासाठी काही महान फोटोग्राफर तर वन्यजीव तसेच त्यांचे अधिवास यांना हानी पोहोचवायला पण मागे पुढे पाहत नाहीत. जणू काही वाइल्डलाइफ फोटोग्राफीची एक नशाच चढलेली असते. 
              निसर्गात काम करताना बाहेरील भौतिक जगाचा नक्कीच विसर पडतो. कारण निसर्गातील मनोरम्य कलाकुसरी तश्या आहेतच. पण फोटोग्राफी ही का करावी, याच उत्तर आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? आज एखाद्या वाघाचा फोटो शेकडो किलोमीटर दूर जाऊन हजारो रुपये खर्च करून मोठ्या आनंदाने आपण मिळवतो ,पण पुढे काय? त्या फोटोला एका कोपऱ्यात तुमचं नाव लागेल.  कदाचित एखादा पुरस्कार देखील मिळेल. सहज गूगलवर 'Tiger' अस सर्च केलं तर कित्येक फोटो मिळतात मग त्या फोटोत आपल्या फोटोच स्थान काय? मुळात आपण निसर्गाशी निगडित ज्या ज्या काही संकल्पना तयार केलेत त्यांचा बऱ्याच अंशी चुकीचा अर्थच आपल्याला माहीत आहे. जसं की 'इको टुरिझम' ,आता इको टुरिझम म्हटल की सर्वांना डोळ्यासमोर येत ते हिरव्या गर्द जंगलात कौलारू आणि वारली पेंटिंगने रंगवलेल्या भिंती असलेली रिसॉर्ट. ओपन टॉप जीपमधून शॉर्ट आणि गोल टोपी घालून केलेली जंगल सफारी, चुलीवरच गावरान जेवण, एखादा धबधबा आणि कांदाभजी वैगेरे ... पण त्याची दुसरी बाजू कदाचितच आपल्याला दिसून येते, ती म्हणजे त्याच रिसॉर्टसाठी बेछूटपणे तोडलेली जंगले... आणि तुटलेली जंगलांची सलग्नता...जंगलाच्या शेजारी जाऊन केलेलं सर्व प्रकारचं प्रदूषण, सुंदर दरीच्या पायथ्याला जमा झालेल्या दारूच्या बाटल्या आणि कचरा. वाहनाच्या धडकेत मृत होणारे वन्यजीव, साप असे बरेच काही...
मग हे इको टुरिझम आहे का? नाही मित्रांनो इको टुरिझम म्हणजे 'निसर्गात वावरताना निसर्गातील कोणत्याच घटकावर अतिरिक्त ताण न देता किंवा निसर्गाच्या साखळीत कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न आणता निसर्गातील सौंदर्याचा अनुभव घेणं.' म्हणजेच इको टुरिझम. हे तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही तर निसर्गाचा विचार करून केलेलं टुरिझम म्हणजे 'इको टुरिझम'.
        वरील दाखला देण्याचं कारण म्हणजे अगदी तसच वाइल्ड लाईफ फोटोग्राफीच्या बाबतीत ही आहे. माणसांनी वन्यजीवांचे फोटो काढले तर ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अस नाही आहे. तर वन्यजीवांसाठी, त्यांना कोणताही त्रास न देता त्यांच्या संवर्धन कार्यासाठी केलेली फोटोग्राफी म्हणजेच 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफी'
ज्या फोटोग्राफीचा उद्देश हा वन्यजीवांचा अभ्यास करणे किंवा एखाद्या परिसरात त्यांचं अस्तित्व संवर्धित करणे हा आहे, जेणे करून तो परिसर आणि तेथील त्यांचं वास्तव्य हे अबाधित राहील. मग आपण काढलेले किती वन्यजीवांचे फोटो त्यांच्या संवर्धनासाठी वापरतो? मग आपण करतो त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणायची का? असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.
                          पन्हाळा आणि मसाई पठार हा जैवविविधतेच्या दृष्टीने खूप समृध्द असा भाग आहे. नुकताच महाराष्ट्र शासनाने या ठिकाणांना संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा दिला. हे काही सहज साध्य नाही झालेलं. त्यासाठी या परिसरातील समृध्द वन्यजीवन आणि वनस्पतींच्या प्रजातींच्या अस्तित्वाचा पाठपुरावा शासन दरबारी करावा लागतो. त्यासाठी कित्येक पर्यावरण आणि निसर्ग अभ्यासकानी परिश्रम घेतलेले आहेत. परंतु आज या परिसरात पाहिलं तर हॉटेल्स, फॉर्म हाऊस, प्लोट्टींग अशी संस्कृती वाढत आहे. ज्याचामुळे जोतिबा, पन्हाळा, सादळे- मादळे, मसाई पठार या भागातील वन्यजीवन हे धोक्यात आहे.
आपल्या आसपासचा निसर्ग राखून ठेवण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ते काम फक्त सरकार करेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आता जोतिबा पन्हाळा परिसर हा नैसर्गिक दृष्टीने जपला गेला पाहिजे असं आपल्याला कधी वाटेल जेव्हा आपल्याला तेथील नैसर्गिक संपन्नता समजायला लागेल आणि त्याकरिता तेथील वन्यजीवन आणि जैवविविधता ही आपल्यासमोर यायला हवी. मग ती माहिती कार्यक्रमाच्या मार्फत असेल, एकद्या बातमीतून असेल किंवा एखाद्या फोटोमधून. काही जणांना नक्कीच वाटेल की त्यामुळे वन्यजीवांचा ठावठिकाणा समजेल आणि शिकारी लोक शिकार साधतील. ही शक्यता वर्तवण्यात येत आहे हे एकदम बरोबर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ नुसार एखाद्या वन्यप्राण्यांचा अधिवासाला धोका पोहोचेल अस कोणतेही कृत्य हा गुन्हा समजण्यात येतो. त्यामुळे वन्यजीव छायाचित्रकार देखील वन्यप्राण्यांचा फोटो सोबत फक्त मोगम त्या ठिकाणचे नाव देतात. नेमका फोटो कोणता आहे हे सांगणे टाळतात. पण मला सांगू वाटत की, ही जी शिकारी लोक आहेत ती कोणताही वन्यजीव छायाचित्रकार वाघ, बिबट्याचे फोटो अपलोड करेल मग आपण जाऊन त्यांची शिकार करू याची वाट पहात नसतात. त्यांना या सगळ्यांशी काही लेण देणं नसत. पन्हाळा जोतिबा परिसरात ससे, मोर, रानकोंबड्या यांच्यासाठी रोज सापळे लावले जातात. ही लोक कोणताही फोटो बघून त्या प्राण्यांना मारायला जात नाहीत. ही लोक जशी निसर्गाच्या विरोधात काम करत आहेत, तस आपण निसर्गाच्या रक्षणासाठी काम करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की जोतिबावरील जो बिबट्याचा फोटो वायरल झालाय तो या शिकाऱ्यांसाठी नसून जोतिबा पन्हाळा परिसरातील वन्यजीवांबाबत तळमळ असलेल्या निसर्गप्रेमींसाठी आहे. तो फोटो आणि काही व्हिडिओ पाहिलं की लक्षात येत तो बिबट्या विश्रांती घेत आहे आणि फोटो काढण्याची पद्धत किंवा अंतर पाहिले तर या फोटोग्राफीमुळे त्याला कोणताही व्यत्यय आला आहे अस दिसून येत नाही. आता याचे अजून फोटो मिळतील या आशेने हौशी फोटोग्राफर य परिसरात गर्दी करतील हे देखील बरोबर आहे. पण तो बिबट्या आहे आणि त्याचे फोटो काढणं हे एकाद्या पणावठ्यावर बसून पक्षांचे फोटो काढण्याइतपत सोप नाही कारणं बिबट्या हा आसपासच्या परिसरात सहज मिसळून जातो आणि त्याच्या बसण्याच्या जागाही कडे कपारीत असतात. त्यामुळे लपलेला बिबट्या नजरेत येण्यासाठी छायाचित्रकार हा एक निपुण आणि अनुभवी वाईल्ड लाईफ फोटोग्राफरच असायला हवा. या परिसरात बिबट्याचा वावर आहे हे सर्वश्रुत आहे पण कित्येक वर्षांमध्ये इतका स्पष्ट आणि सुंदर फोटो कदाचितच क्लिक झाला असेल. या फोटोमुळे या परिसरातील वन्यजीवांच्या अस्तिवाच रक्षण व्हायला हव, याची प्रेरणा मिळून जाते. येथील समृध्द परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित होत. उद्या तेथील निसर्गाला हानी पोहोचणारा एखादा प्रकल्प या परिसरात होऊ घातला तर त्याला थांबण्यासाठी हा सक्षम पुरावा म्हणून या फोटोकडे पाहता येईल. तिथे आढळणारा बिबट्या हा तिथेच राहिला पाहिजे. कारण त्या बिबट्या सोबतच त्याची संपूर्ण अन्न साखळी तिथे वास्तव्य करत आहे. त्यासाठी तो परिसर तसाच सवर्धित राहिला पाहिजे. त्याकरिता हे सगळं चांगल्या विचारांच्या सजग निसर्गप्रेमींसमोर यायला हवं. अंतिमतः एवढच सांगू इच्छितो की पर्यावरणाच्या संदर्भातील गोष्टींना नेहमीच दोन एकमेकांच्या विरुद्ध बाजू असतात. सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही दृष्टीने या गोष्टींकडे पाहता येत. यातील आपण कोणती बाजू स्वीकारायची हा आपला स्वतःचा निर्णय असेल. त्यामुळे आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होऊ, पण ते आपल्यासाठी नाही तर या वन्यजीवांसाठी....
धन्यवाद ...

चेतन सुरेश कोकटनूर
Inside Nature, Kolhapur 

Comments

  1. एक दुसरी बाजू दाखवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न... हौशी मंडळी आणि त्यात आयुष्य खर्ची घातलेले लोक या दोन्ही बाजू लोकांसमोर येणं गरजेचं आहे.. eco tourism ची वास्तव मधली संकल्पना स्पष्ट केलीत ते एक बरं झालं... Packages आणि moment च्या जमण्यात निसर्ग बघण्यासाठी आपल्याला पैसे द्यायला लागू नयेत, इतकी माणूस प्रगती करू नये हीच इच्छा..🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...