Skip to main content

ठिपक्या वाघाची विष्ठा


         

                            मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत.
‌                        थोड पुढं गेल्यावर आमच्यात सगळ्यात पुढे चालणारे मामा थांबले आणि खाली वाकून काही तरी करू लागले. सगळी मुलं थांबली. मी रांगेत थोडा मागे असल्याने स्पष्ट दिसत नव्हतं, काही तरी सापडलं असेल म्हणून मी गडबडीने पुढे आलो. तर ते एका काठीने कोणत्या तरी प्राण्याची विष्ठा विस्कटत होते. ती जागा थोडी मोकळी होती त्यामुळे सगळेच त्यांचा भोवताली जमा झाली. "पोरांनो, ही ठिपक्या वाघाची शिट हाय बघा. काय काय खाल्ल होत त्याच्या हाडाच तुकड बी दिसत्यात". दोन्ही पाय दुमडून बसलेले मामा ती पांढरट रंगाची विष्ठा विस्कटत बोले. लगेच वाघाची विष्ठा हा शब्द ऐकताच सगळी मुले ऊ...हु..... वाघ!‌ ‌अशी अचंबित झाली. तेवढ्यात जोशी सर बोले, "अरे ठिपक्या वाघ म्हणजे बिबट्या." (सह्याद्रीच्या आणि कोकणातील ग्रामीण भागात अजून ही बिबट्याला ठिपक्या वाघ , वाघूर असच ओळखतात.) पुढे सरांनी मामाकडे बघून विचारलं," मामा, इथे पट्टेरी वाघ दिसतो का कधी?" त्यावर मामा बोला," आता काय आधीसारख जंगल न्हाय, म्हणून कमी झाला.  आमच्या बाबा आज्यान बघितलं व्हत. मी काय आमच्यात कोणीच नाय बगाय."
                            बिबट्या हा प्राणी मार्जार कुळातील एक भक्षक आहे. वाघाप्रमाणे अन्नसाखळी नियंत्रित करण्यामध्ये याची पण मोलाची भूमिका आहे. वाघांच्या तुलनेत सह्याद्रीमध्ये बिबट्याची संख्या ही समाधानकारक आहे. वाघापेक्षा वजनाने बराच कमी आणि तुलनेत खूप चपळ असलेला हा प्राणी झाडावरही सहज चढतो. सध्या वनक्षेत्र हे संकुचित होत आहे, तसेच बिबट्या सारख्या भक्षक प्राण्यांच्या भक्षाची शिकार (हरीण, ससा इत्यादी) मानवाकडून प्रचंड होत आहे. अजूनही शिकार करून गावात वाटे लावल्याची पद्धत घाटावर आणि कोकणात सर्रास सुरू आहे. त्यामुळे या बिबट्यासारख्या प्राण्याला मनुष्य वस्तीतील पाळीव प्राण्यांचा भक्ष म्हणून पर्याय निवडावा लागतो. अतिशय चपळाईने तो जंगलाच्या आसपास अतिक्रमित झालेल्या गावामधील शेळ्या, कुत्री अश्या प्राण्यावर हल्ला करतो. त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी याचा संपर्क थेट माणसाशी येऊन मानव वन्यप्राणी संघर्ष उत्पन्न होऊन हा प्राणी बदनाम होतो. नाहीतर एरव्ही हे सगळे वन्यजीव माणसाचा संपर्क टाळण्याचाच प्रयत्न करतात.
      सर थोडे बाजूला होत सगळ्यांकडे बघत बोले,"आता लक्ष द्या इकडे, तो वर डोंगराचा कडा दिसतो का, तिथे जायचं आहे आपण आणि तो कडा म्हणजे शिवाजी महाराजांचा एक गड आहे." सगळी मुलं, "काय सर किल्ला!" सर पुढे बोले "हो, वनदुर्ग आहे हा.  गडाला जायला दुसरी सोपी वाट आहे पण थोड जंगलातून जाऊया म्हणून आपण या वाटेने आलोय. मग पुढे कुठल्या वाटेने जाऊया? रस्त्याने थोड सोप आहे आणि जंगलातून ही अशीच वाट आहे." आम्ही सगळया मुलांनी सरांना अपेक्षितच उत्तर दिलं . "सर , जंगलातून". तेवढ्यात मामा बोले, "पर इथून पुढं सांभाळून यायचं हा, कांठ हायत भरपूर." (कांठ म्हणजे जळू)  तस मामाच ऐकून लगेच प्रत्येक जण आपापले पाय पँट वर करून बघू लागला, अगदी सर सुध्दा." अजून नाही लागला, चला ". अस हसत बोलून सर पुन्हा मामाच्या मागून चालू लागले. थोडा वेळ चालून पुढे गेल्यावर मी सरांना विचारलं , " सर, गडाच नाव काय आहे हो?" सर पुढे चालतच मोठ्याने बोले, "महिमतगड....आहे हा, महिमतगड"......
    

-  ChetanKokatnur
      
     
      

Comments

  1. It's now getting more interesting........

    ReplyDelete
  2. झकास एक्दम... जंगलात गेल्याचा अनुभव घरातूनच मिळाला...शेवट वाचताना नजर आपसूक पायाकडे वळली😂😂😁🙌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. लॉकडाऊनमुळे घरातूनच अनुभव घ्या.😁

      Delete
  3. intresting NATURE Stories Sir. Nice one. Very excited to not only read it but Also feeling like I was there.

    ReplyDelete
  4. Experiencing it 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. Jangalat gelyasarakha ch vatatay..int interesting

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...