Skip to main content

सापांच्या शोधात...आंबा घाट



                       वन्यजीवांच्या सहवासात राहण्यासाठी आपण खूप सारी जंगल पालथी घालतो. परंतु असे बरेच वन्यजीव आहेत जे नेहमी आपल्या सहवासात राहत असतात. आपल्या घराभोवती उडणारे शिंजीर, बुलबुल, चिमणी, दयाळ यासारखे रोज दिसणारे पक्षी आणि आपल्या आसपास उडणारी फुलपाखरं हे देखील वन्यजीवच आहेत. आता हे कोणाकोणाला पचनी पडणार नाही. 'आम्ही तर रोज बघतो हे पक्षी, चिमणी तर आमच्या घरात येऊन उडून जाते. मग काय आमच्या घरात वन्यजीवांचा वावर आहे?'
अशीच साधारण प्रतिक्रिया असेल परंतु आपल्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये आपल्या आसपास असणारे सर्वच प्राणी पक्ष्यांना ( काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत प्राणी वगळून ) वन्यजीव अस घोषित करून त्यांना या कायद्याचं संरक्षण देखील दिलं गेलंय. शेवटी या सगळ्या प्राण्यांचा उगम हा वनातूनच. आणि त्यांचे निसर्गातील स्थान ही तितकेच महत्वाचे, तरी पण यातले काही आपल्याला रोज दिसणारे असतात म्हणून त्यांना आपण विशेष वन्यजीव असा दर्जा देण्याच्या मानसिकतेत नसतो. मात्र यात एक खास अपवाद ठरतो तो म्हणजे साप! जो नेहमी घराच्या आसपासच असतो पण त्याचे दर्शन अथवा संपर्क हा काही तरी ' हॉरीबल ' असाच फील आणून देतो. थोडक्यात काय की अस्सल वन्यजीव अशी जाणीव करून देतो.
              सर्पमित्र म्हणून आपल्या मानवी वस्तीत आढळणारे काहीच साप मी हाताळत होतो. सापांची खूप सारी पुस्तकं आणि माहिती साहित्य वाचून झाले होते पण जे आपल्या या पश्चिम घाटातील जंगलांची शान म्हणता येतील असे काही मलबारी चापडा ( Malabar pit viper ), हरणटोळ ( Green vine snake ) असे साप काही नजरेस पडत नव्हते. परंतु जेव्हा कधी जंगलातील भटकंती ला जाऊ तेव्हा त्यांची भेट नक्की होणार याची खात्री होती.
तेव्हा पावसाळ्यात हा एक बेत ठरला. मी आणि माझा मित्र स्वप्नील आम्ही दोघे साधारण जून महिन्याच्या शेवटी टू व्हीलर काढून अगदी सकाळी सकाळी बाहेर पडलो. स्वप्नील हा जॉब करत होता. त्याला वन्यजीवनाविषयी जास्त आवड नव्हती पण भटकंती करायला मात्र आवडत होते.  माझ्यासोबत फिरताना साप तेन पहायला मिळतात या एकमेव आशेने तो माझ्या बरोबर अश्या जंगल सफरीला  येत होता. रस्त्यांची दुर्दशा आणि पुन्हा संध्याकाळपर्यंत परत येण्याच्या उद्देशाने दोघांचं एकमत हे आंबा घाटात जाण्यावर झाल होत. आंबा हे कोल्हापूरमधील सर्वात उत्तरेकडच एक समृद्ध राखीव वनक्षेत्र. आंब्याच्या उत्तर दिशेला चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचा बफर झोन हा आंब्याला लागूनच आहे. दक्षिण बाजूला राधानगरी अभयारण्य आहे त्यामुळे हा परिसर वन्यजीवांच्या सलगतेच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. हिरडा, बेहडा, नरक्या अश्या औषधी वनस्पतींची  भरमार या जंगलात आहे. तसेच पावसाळ्यात उगवणाऱ्या ऑर्किड मध्ये ही खूप विविधता सापडते. रिसॉर्ट आणि पर्यटकांची चांगलीच ये जा या परिसरात असूनही येथे वन्यप्राण्यांचे दर्शन हे अगदी सहज होत असते. गवे तर इथे मोठ्या प्रमाणात दिसतात. याखेरीज इतर वन्यजीव पहाता बिबट्या, भेकर, सांबर, शेकरू असे प्राणी तर मलबारी धनेश सारखे सुंदर पक्षी देखील या परिसरात आढळतात. 
                         आम्ही मोठ्या उत्साहाने कोल्हापूर सोडल. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला ओलांडताच शहर सोडून एकदम दुर्गम भागात येऊन पोहचलो असेच वाटत. त्याच कारण म्हणजे रस्त्याच्या एका बाजूला असलेला जोतिबाचा डोंगर आणि दुसरीकडे पन्हाळगड.
पन्हाळ गडाला वळसा घालून आम्ही अर्धे अंतर पार केले तरी कुठेतरी मागे पन्हाळगडाच्या बाजूला असलेल्या मसाई पठाराच्या कडा दिसतच होत्या. वाटेत मस्त बटाटे भजीचा नाष्टा करून आम्ही सकाळी साडेनऊ वाजता आंब्यात पोहोचलो.जसे जसे आंब्याकडे जात होतो तसे हवेतला गारवा आणि अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी चांगल्याच वाढत होत्या. पावसात कॅमेरा, मोबाईल सांभाळत टू व्हीलर चालवणं हे दिव्यच असते. तरी सगळं काही पॅकबंद प्लास्टिक पिशवीत ठेवून ते मागे बसलेल्या स्वप्नील कडे दिलेलं होत. रेनकोट कितीही चांगला असू दे, घाटातला पाऊस हा तुम्हाला भिजवतोच याची प्रचिती आम्ही आंबा गाव सोडून थोड पुढे विशाळगड रस्त्याला लागल्यावर च आली होती. आंबा विशाळगड मार्गावर जंगलाच्या सुरवातीला लागणाऱ्या मानोली या छोट्या बंधाऱ्याचे दृश्य बघताच न थांबणारा क्वचितच या रस्त्याने जात असेल. अगदी गोलाकार आकाराचा तिन्ही बाजूने टुमदार जंगलाने वेढलेला हा तलाव पावसाळ्यात ढगांनाही आपल्या
कडे खाली ओढून घेतो असे भासत होते.
आता मी गाडी स्वप्नील ला चालावं असे सांगून गाडीवर मागे बसलो. मानोलीचे ते नयनरम्य दृश्य पाहून आमची गाडी वळणे घेत जंगलाच्या गाभ्यात शिरत होती. काही तरी कॅमेरात टिपण्यासारख मिळत का ते शोधत मी डोळ्यात जाणार पावसाचं पाणी पुसत पुसत अगदी बारकाईने निरीक्षण करत होतो. तोच नजर रत्यावर आली आणि मी स्वप्नीलला म्हणालो, " गाडी थांबव, साप होता रस्त्यावर मागे." त्याने कचकन ब्रेक लावला आणि मी तशीच उडी मारून मागे धावत आलो. रस्त्याच्या मधोमध एक साप होता. परंतु मेलेला! हरणटोळ. मी मोठ्याने ओरडतच स्वप्निल कडे बघितलं, "ग्रीन वाइन आहे रे, रोडकिलं" माझ्या आयुष्यातला पहिला हरणटोळ हा साप मी पहिला पण तो मेलेला होता. त्याचे काही फोटो घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या मार्गाला लागलो. जंगलात पाऊस सुरूच होता. झाडावरून खाली पडणारे मोठे पाण्याचे टपोरे थेंब चेहऱ्यावर टपकन आपटलं की कोणीतरी जोरात थोबाडीत मारल्यासारखे वाटत होतं. पावसामुळे जंगलात सगळच हलत होते. त्यामुळे सापासारख्या जंगलाच्या रंगात मिसळून   जाणाऱ्या प्राण्याची सुक्ष्म हालचाल नजरेत पकडणं तर अशक्य होत. आम्ही तेव्हा तरी फक्त गाडी सांभाळत रस्त्यावरच नजर ठेवून निघालो होतो.थोड पुढे गेल्यावर अजून एक हरणटोळ आणि मलबारी चापडा हे रस्त्यातच चिरडून मेलेले दिसले. जे साप झाडावर शोधत होतो ते तर अगदी सहज रस्त्यात मरून पडलेले दिसत होते. यातला हरणटोळ तर जगातल्या काही प्रमुख देखण्या सापापैकी एक. तीन तास उलटून गेले तरी बेडकांचे आवाज आणि मेलेले साप याखेरीज काहीच वन्यजीवन आम्हाला दिसले नव्हते. आम्हीही रस्ता सोडून कुठे आत शिरलोच नव्हतो.  एकूण तेरा साप मेलेले आढळले, त्यात सहा सात ते हरणटोळच होते बाकी चापडा, खापरखवल्या, मांजऱ्या हे देखील होते. दुपारच्या जेवणासाठी आंब्यातच यावं लागणार होत. आम्ही परत फिरलो, " जेवणानंतर तरी दिसेल का रे साप?", सप्नील नाराजीच्या सुरातच बोलला. मी म्हणालो," हरणटोळ तरी नक्की दिसेल"  पण खरं तर मला पण शंकाच वाटत होती, असे वाटत होते की हे मेलेले साप आमच्या गाडीसमोर का नाही आले?... किमान त्यांचा जीव तरी वाचला असता आणि आमची हौस पण फिटली असती.एवढं फिरून एक पण जिवंत साप नाही दिसला! सगळे साप काय या गाड्यांनी रस्त्यावरच खाऊन टाकले की काय?" पावसामुळे पर्यटकांचा जोर पण वाढला होता. आम्ही घाट उतरत पुन्हा तेच वाटेतील मेलेले साप बघत आंब्यात येऊन पोहोचलो. अन् भिजलेल्या अंगाने तसच बसून मस्त गरमा गरम जेवण करत पुढचं प्लॅनिंग सुरू केलं......... क्रमशः

Green Vine Snake




चेतन कोकटनूर
वन्यजीव अभ्यासक
Inside Nature, Kolhapur



Visit to our YouTube channel:- 

https://youtube.com/channel/UC67Yug2Iqeyf6RF9lsdfLNA


Comments

  1. Bhawa apn gelo hoto to pn part publish kr na
    Tu mi gaju sir vishwanath

    Ani ha gargoti bhagat eka tikani gelo hoto to pn part

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच लवकरच करेन तो पण ब्लॉग...जंगलात कोणत्याही साधना शिवाय एक पूर्ण रात्र घालवण्याचा अनुभव खूपच स्मरणीय आहे.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...