कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज
सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत.
हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल.
२०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता, कोल्हापूर शहराच्या आसपास वर्षातील काही दिवस हे गव्यांचे दर्शन होतेच. साधारण हा काळ डिसेंबर महिन्यातील असतो. तस पाहीलं तर गवे किंवा गव्यांचा कळप जेव्हा जंगल सोडून बाहेर दिसू लागतात तर त्या मागे बरीच कारणे असू शकतात.
संकुचित होणार जंगल आणि मानवी हस्तक्षेपामुळे तुटणारी जंगलांची सलग्नता ही काही ढोबळ कारणे असली तरी अजूनही काही सूक्ष्म कारणे आहेत त्यांचा प्रामुख्याने विचार करायला हवा.
गवा हा तसा खूप लाजाळू प्राणी आहे, माणसाच्या तुलनेत प्रचंड ताकद असूनही तो माणसाचा संपर्क टाळतो आणि तिथून पळून जातो. जंगलात गव्यांचे चार पाच संख्येपासून पंचवीस तीस इतक्या संख्येचे कळप असतात. या कळपावर त्यांच्यातील एका प्रौढ नराचे अधिपत्य असते. कळपात इतरही नर असतात, कित्येक वेळा या नरांच्या मध्ये कळपावरील अधिपत्यासाठी झुंजी होतात. ज्यामध्ये हरलेला नर गवा हा तो कळप सोडून बाजूला जातो आणि नवीन प्रदेशाचा शोध सुरू करतो. अश्या वेळी या गव्यांच्या प्रवासात काही वेळा आपल्या मानवी वस्त्या किंवा गावे येतात. परंतु गवे मानवी वस्तीकडे येणाच्या कारणांमध्ये या कारणाचे प्रमाण खूपच कमी असते.
दुसरं अजून आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, जंगलातील त्यांची प्राथमिक गरज अन्न आणि पाणी.
पावसाळयात जंगलात बऱ्याच ठिकाणी तात्पुरते पाणीवठे तयार होतात, तसेच जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतही पूर्णपणे वाहू लागतात. पावसामुळे जंगलात सर्वत्र पावसाळी वनस्पती वाढतात. ज्यामुळे गव्यांना मुबलक प्रमाणात पाणी आणि अन्न उपलब्ध असते. पण जसं जसं पावसाळा संपून ऊन वाढू लागत तस जंगलातील हे छोटे छोटे पाणीसाठे आटू लागतात आणि सोबतच हिरव रान संपून जंगल कोरड पडायला सुरवात होते.
या कालावधीतच पाणी आणि हिरव्या चाऱ्यासाठी या गव्यांचे कळप आपला प्रदेश सोडून इतरत्र भटकू लागतात. शेतीच्या ठिकाणी पीक स्वरूपात त्यांना बरच अन्न मिळत पण पाणी पिण्यासाठी त्यांना बोअरवेल आणि विहीरी सुयोग्य ठरत नाहीत.
त्यामुळे मुख्यत्वे पाण्यासाठी त्यांची अधिक प्रमाणात भटकंती होते. कित्येक ठिकाणी गवे विहिरीत किंवा कालव्यात पडलेल्या घटना या गव्यांच्या पाण्याच्या गरजेला अधोरेखित करतात.
हे गवे शक्यतो रात्रीच्या वेळेस आपला प्रवास करत असल्यामुळे एखाद्या मोठ्या शहराजवळ येऊ पर्यंत त्यांचं दर्शन होईलच अस नाही. आणि जेव्हा त्यांचं दर्शन होत तेव्हा नागरिक आणि प्रशासनाची एकच धांदल उडते.
तस पाहिलं तर जंगलाच्या आसपास असणाऱ्या गावातील लोकांसाठी गवे दिसणं, शेतात येणं हे नित्याचेच झाले आहे. काही ठिकाणी माणूस आणि गवे हे सहजीवन स्वीकारलं ही गेलं आहे. तर काही ठिकाणी त्यांच्यात संघर्ष सुरूच आहे. त्यात कधी गव्यांच्या जीवाला हानिकारक गोष्टी घडतात तर कधी माणसांच्या. पण जेव्हा मानवी हानी होते तेव्हाच हा मुद्दा ऐरणीवर येतो.
पण जंगलापासून लांब अंतरावर असलेल्या शहरी परिसरात गवा दिसणं ही गोष्ट शहरवासीयांना एखादा परग्रहवासी दिसण्याप्रमाणेच भासते.
'आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्यावर आपण मनुष्य प्राणी सोडून इतर प्राण्यांच्या पण तेवढाच अधिकार आहे. आपल्या आसपास त्यांचा वावर हा आपल्या इतकाच साहजिक आहे', या जाणिवेच्या अभावामुळे अशी प्रतिक्रिया शहरी भागात वन्यजीवांच्या दर्शनाबद्दल होते.
वन्यजीव खासकरून गवे हे लोकवस्ती पार करून शहरापर्यंत का पोहचतात याची कारणे आपण पहिली. पण यावर काय उपाय करणे अपेक्षित आहे, या प्रश्नाचं उत्तरही तितकच कठीण आहे. अजून डिसेंबर महिना उजाडला नसला तरी यावर आधीच चर्चा करण्याचं कारण म्हणजे या वर्षी कोल्हापूर परिसरात गव्यांच दर्शन होण्यासाठी यंदा डिसेंबर महिना येण्याची गरज नाही.
यावर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण हे मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या जंगलातील पाणवठ्यांची सद्यस्थिती पाहता, वन्यप्राण्यांना पाण्याची भीषण टंचाई भासणार आहे. त्यामुळे गव्यांचे हे तात्पुरते स्थलांतर एक दोन महिने अलीकडेच होण्याची शक्यता आहे.
तेव्हा आपल्याला कोल्हापूर शहरात ऑक्टोबर महिन्यातच एखादा गवा दिसून आला तर नवल वाटायला नको.
गव्यांचा किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्यांचा वावर गावाच्या आसपास होऊ लागतो तेव्हा वनविभागाने त्याची व्यवस्था करावी, तो वन्यप्राणी वनविभागाने पकडून जंगलात सोडावा अशी मागणी होऊ लागते.
एखाद्या बिबट्या किंवा तरसासारख्या प्राण्याच्या बाबतीत ते शक्यही होत. पण गव्यासारख्या प्रचंड ताकदीच्या प्राण्याला पकडणं इतकं सोपंही नाही आणि शक्यही नाही.
आपण काही उपाय करून त्यांना हुसकावून लावू शकतो, जसे की आवाज काढणे, फटाके फोडणे, बटाटा गनचा वापर करणे आणि आत्यंतिक स्थितीमध्ये बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.
पण या सर्व उपायांची उपयोगिता कमी आणि मर्यादाच जास्त आहे.
आणि गव्यांसमोर हे सर्व उपाय खूप तोकडे पडतात.
कोल्हापूर असो किंवा पुणे इथे अश्या स्थितीला हाताळण्यासाठी वनप्रशासानाला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागते. पण ती मदत गव्याला पकडण्यासाठी नाही तर अतिउत्साही लोकांना आवर घालण्यासाठी असते.
कारण कोणत्याही अश्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्वात मोठा अडथळा ठरतो तो म्हणजे बघ्या लोकांची गर्दी.
हा केवळ एक अडथळाच नाही तर एक खूप मोठा धोका पण आहे, कारण या गर्दीत कोणताही वन्यजीव असो, तो बिथरतोच. या दरम्यान गर्दीतील माणसांवर हल्ल्याची शक्यताही वाढते तसेच एका ठराविक वेळेत जर त्या प्राण्याचं रेस्कू झालं नाही तर दमल्यामुळे त्या प्राण्याचाही जीव धोक्यात येतो. गव्याच्या बाबतीत हे सर्रास घडून येत.
भविष्यात मानव आणि वन्यप्राण्यांचा संपर्क हा वाढतच जाणार आहे त्याला संघर्षामध्ये रुपांतरीत करायचे का सहजीवनामध्ये हे आपल्या सामान्य नागरिकांच्या हातात आहे.
तरी येणाऱ्या काही दिवसात कोल्हापूरात असे प्रकार टाळले जावे यासाठी वन विभागाने सज्ज राहणे तर गरजेचं आहेच. पण त्याच सोबत आपण नागरिकांनीही या गोष्टीची मानसिकता ठेवून एखादा गवा शहरात अथवा आसपास दिसला, तर काय करायचं याची रूपरेषा आधीच आपल्या डोक्यात तयार करून ठेवायला हवी.
सर्वात महत्वाचं सोशल मीडियावरून एखाद्या ठिकाणी गवा आला आहे याची प्रसिध्दी करून गर्दीला विनाकारण गोळा करू नये.
त्याच सोबत संबंधित विभाग म्हणजेच वन विभाग यांचे संपर्क क्रमांक सोबत असणं आणि असे प्रकार निदर्शनास आले की प्रथम वन विभागाला कळवणे ही जबाबदारी समजून वागायला हवं.
गवा दिसून आला तर तो आल्या वाटेने परतही जातो त्यामुळे त्याला वाट मोकळी करून देणं खूप गरजेचं असतं. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस सह्याद्रीच समृध्द अस वनक्षेत्र आहे. त्यामुळे आपल्या परिसरात गव्यांच आगमन हे शहराच्या पश्चिम दिशेकडून होत. तेव्हा पश्चिम बाजूला या गव्यानां वाट मोकळी करून देणे गरजेचं असतं.
मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे गर्दीकडे गवा धाव घेऊ शकतो तेव्हा शांतता पाळून गव्याला वाट करून द्यावी.
शक्यतो रात्री अंधारात शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी.
अश्या छोट्या छोट्या गोष्टी पाळून आपण गव्यांच्या आणि आपल्या संघर्षाची तीव्रता कित्येक पटीने कमी करू शकतो.
हा सर्व लेखप्रपंच यासाठी की येणाऱ्या काही दिवसात असे प्रसंग उद्भवू शकतात आणि त्यासाठी प्रशासनासोबत आपण नागरिकांनीही सकारात्मक आणि सजगपणे या आपल्या निसर्गातील घटकांना सामोरे जाणे गरजेचे आहे.
धन्यवाद...!
©चेतन सुरेश कोकटनूर
वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर.

🤩🤩👌👌👌👌
ReplyDelete