Skip to main content

महिमतगड...



                 
                                   साधारण सकाळचे दहा वाजले, तेव्हा आम्ही गडावर पोहोचलो. थोडी नजर खाली करून बघितलं तर कळलं की काल बस मधून उतरल्या उतरल्या जे डोंगराचे कडे दिसत होते त्यावरच हा गड आपले अस्तित्व राखत उभा आहे. (या गडाच्या नावात खूप गोंधळ होतो काहीजण महिमतगड उल्लेख करतात तर बऱ्याच लेखात आणि गुगल मॅपवर महिमानगड असा उल्लेख आढळतो.) मी सोबत आणलेल्या साप पकडायच्या अाकड्याने साप तर पकडला नाही पण चढताना अधीमधी त्याचा टेकू म्हणून वापर मात्र नक्की झाला. थोड पुढे आल्यावर मामा म्हणाले, " हा गडाचा मेन दरवाजा" थोडेफार दगडी बांधकामाचे अवशेष होते तिथे. त्यातल्याच एका दगडावर सकाळी ऊन खात पडलेली एक घोरपड आमची चाहूल लागताच दगडाच्या कपारीत गायब झाली. तिथून पुढे जाताना त्या कपारीत पुन्हा एकदा वाकून बघायला मी विसरलो नाही.
             कधी काळी मावळ्यांच आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच अस्तित्व या गडावर होत याची प्रत्येक निशाणी मामा आम्हाला दाखवत होते. गडावर प्रचंड प्रमाणात वनराई आणि त्यामध्ये लपलेली भवानी देवीच मंदिर, मारुतीची दगडी कोरीव मूर्ती हे सर्व पाहत पाहत आम्ही सातवीत शिकलेला शिवरायांचा इतिहास आठवत होतो. गडाचे पूर्वेकडील बुरुज हे सुस्थितीत दिसत होते. गडावर दोन बांधीव तलाव होते पण त्यात पाणी काही दिसलं नाही. भवानी मातेच्या मंदिरासमोर दोन तोफा आम्हाला दिसल्या. जोशी सर म्हणाले, "अरे , आपण एक काम करू या तोफा अशाच गवतात पडलेत त्यांना किमान दगडावर तरी ठेवून देवू."  आम्ही आमच्या बॅग मंदिरासमोर ठेवून मोठे दगड घेऊन आलो. त्या तोफेचे तोंड थोड वर होईल अशी त्याची मांडणी केली. इतिहासाचे साक्षीदार असे बेवारस पडलेले पाहून थोड दुःख तर झालाच होत पण या अश्या शिवकालीन वस्तू आम्ही स्वतः हाताळत होतो आणि ते ही चांगल्या आदरपूर्वक भावनेने हे आमच्यासाठी भलतंच आनंददायी होत. सरांनी आपल्या कॅमेरा ने आमचा त्या तोफांसोबत एक ग्रुप फोटो काढला, तोच आमच्यातल्या एकाने जोरात "छत्रपती शिवाजी महाराज की" अशी घोषणा दिली सुध्दा. त्या घोषणेला ' जय ' असा जोरदार प्रतिसाद देत आम्ही किल्ल्याच्या पुढच्या भागात येऊन पोहोचलो.
               किल्ल्यावरील शंकराचे मंदिर आणि त्या समोरचा उघड्यावर असलेला नंदी पाहून आम्ही बालेकिल्ल्याच्या पायथ्याला आलो तिथून अजून एक डोंगर सोडून थोडा बाहेर आलेला एक सुंदर बुरुज आम्हाला दिसला. बालेकिल्ला म्हणजे ती गडावरची सगळ्यात उंच जागा होती आणि तिथे एक ध्वजस्तंभ होता. परंतु तिथून आसपासच  संपूर्ण प्रदेश दिसत होता. दूरवरच्या खेडी आणि त्यांना जोडणारे रस्ते आम्ही गरुडच्या नजरेनेच पाहत असल्याचा भ्रम काही वेळ आम्हाला झाला, पण थोड्याच वेळात तो तुटला कारण त्याचवेळी आमच्या डोक्यावर गरुडाची एक जोडी आमच्यापेक्षा ही किती तरी वर उडताना दिसत होती.  त्या गरुडाने पुन्हा एकदा मानवी मर्यादांची जाणीव मला करून दिली होती.
               दुपारी जेवणासाठी पुन्हा शाळेतच सोय केलेली होती. येताना मात्र आम्ही कच्चा रस्ता पकडून कुंडी गावाकडे आलो. जेवण झाल्यावर मामांचा निरोप घेऊन आम्ही बस स्टॉपकडे निघालो. "पुन्हा या बाळांनो" अस म्हणत मामाने पण आम्हाला हात दाखवला. देवरुखवरून आलेली बस फिरून देवरुखला जाणार होती त्यात आम्ही बसलो. बस सुटली, अजूनही महीमतगडाचे कडे दिसत होते. चोवीस तासापेक्षाही कमी वास्तव्य असलेल्या या गावातील जंगलाने जे मला शिकवले ते अद्भुत होते. या ट्रेकमध्ये आम्ही एकही मोठा प्राणी किंवा साप पाहिला नाही परंतु जंगल म्हणजे काही ठरावीक मोठ्या प्राण्यांच घर नसून किती तरी अनोळखी वन्यजीवांची ती दुनिया आहे हे लक्षात आले होते. तेथील सर्व वनस्पती आणि इतर जीवांचा अभ्यास करायचं ठरवल तर एक आयुष्य पुरणार नव्हतं. पण आहे ते आयुष्य या मानवी जगतापासून दूर वन्यजीवांच्या सहवासात व्यतीत करण्याचा निर्धार नकळत माझ्या मनाने कधी केला हे मला पण समजले नाही.
                 बस वळण घेत वाड्या वस्त्या पार करत होती आणि मी खिडकीला टेकून आठवत होतो ते... रानकोंबडीची लगबग..., बिबट्याची विष्ठा..., जळूंची वळवळ..., लपणारी घोरपड... आणि उंच उडणारी गरुडाची जोडी.......


- Chetan Kokatnur




Comments

  1. Waiting for another adventure 😍😍

    ReplyDelete
  2. Fabulous❣️💥...

    प्रत्यक्षात मी या गडावर गेलो नाहीये पण आज तुमच्या मुळे थोडी सफर झाली...

    धन्यवाद...

    ReplyDelete
  3. Wish you will travel the entire world and keep sharing your adventurous travelling moment with us👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...